छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीं विरोधात उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींविरोधात उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!
नवी मुंबई (उलवे): महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त आणि चुकीचे विधान करणाऱ्या स्वयंघोषित ‘बागेश्वर बाबा’ उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराजांचा खोटा इतिहास मांडून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याप्रकरणी आज उलवे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या आठवड्यात २४ एप्रिल रोजी नागपूर येथील भारतदुर्गा मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केले होते. शास्त्री यांनी आपल्या भाषणात दावा केला की, “एक दिवस युद्ध करून छत्रपती शिवाजी महाराज थकले आणि ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवून महाराज म्हणाले की, आता माझ्याने चालणे होत नाही, हा राज्यकारभार तुम्हीच सांभाळा.”
धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शालेय पाठ्यपुस्तकांपासून ते ऐतिहासिक बखरी आणि पत्रांपर्यंत कुठेही अशा प्रकारचा उल्लेख नसताना शास्त्रींनी हा ‘जावईशोध’ लावून महाराजांची प्रतिमा एका ‘हतबल योद्धा’ अशी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
उलवे पोलीस ठाण्यात तक्रार
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आज उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रामकृष्ण रजाणे यांनी तत्परतेने तक्रार अर्जाचा स्वीकार केला. या तक्रारीत प्रामुख्याने खालील मुद्दे मांडण्यात आले आहेत:
खोटा इतिहास: कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याशिवाय महाराजांच्या शौर्याला कमी लेखणारा इतिहास मांडण्यात आला.
सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट: हे विधान जाणीवपूर्वक करून शिवप्रेमींच्या भावना भडकावणे आणि महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा हा एक व्यापक कट असू शकतो.
नेत्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह: ज्यावेळी हे विधान करण्यात आले, त्यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांनी शास्त्रींना रोखण्याचा प्रयत्न का केला नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
कठोर कारवाईची मागणी
तक्रारदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच, अशा भोंदू लोकांपासून राज्यकर्त्यांनी दूर राहावे, जेणेकरून भविष्यात कोणाचेही धाडस इतिहासाची मोडतोड करण्याचे होणार नाही.

“शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींच्या प्रतिमेला तडा देण्याचा हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. चुकीचा पायंडा पडू नये यासाठी या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.”

  • ब्युरो रिपोर्ट, Lead India TV
  • #ChhatrapatiShivajiMaharaj
    ​#LeadIndiaTV
    ​#DhirendraShastri
    ​#BageshwarDham
    ​#MaharashtraPolitics
    ​#UlwePoliceStation
    ​#FIR
    ​#MarathiNews
    ​#Shivpremi
    ​#HistoryOfMaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *